हवामान अंदाज ; थंडीला सुरूवात पुढे हवामान कसे राहिल, रामचंद्र साबळे
हवामान अंदाज ; या आठवड्यात हवेच्या दाब 1010 हेक्टापास्कल एवढा राहिल. हा हवेचा दाब शनिवारपर्यंत राहणे शक्य आहे. आता हिवाळी हंगाम तसेच थंडी सुरू झाली आहे. उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील भागावर हवेचा दाब 1012 हेप्टापास्कल पर्यंत वाढण्याची शक्यता असल्याने उत्तर भारतातून वारे दक्षिण दिशेस वाहतील.
उत्तर भारतातील थंड वारे दक्षिण दिशेने वाहण्यामुळे मध्य भारत आणि दक्षिण भारतातील थंडीचे प्राबल्य वाढण्यास सुरवात होईल. साहजिकच किमान तापमानात घसरण होण्यास सुरवात झाली असून महाराष्ट्रातील बहुतांशी भागात किमान तापमान 20 ते 21 अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल आणि थंडीचे प्रमाण हळुवारपणे वाढत जाईल. नोव्हेंबर महिन्याचे पहिल्या दोन आठवड्यात थंडीचे प्रमाण सौम्य राहील. मात्र 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपात राहील.
15 डिसेंबर ते 15 जानेवारी या कालावधीत थंडीची तीव्रता वाढेल. कडाक्याच्या थंडीचा काळ असेल. 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत थंडांचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे साहील. तसेच फेब्रुवारी अखेरीस अथवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थंडी संपुष्टात येईल. हा हिवाळा सर्व पिकांना अनुकूल राहील.
या हिवाळ्यात काही भागात विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक भागात या वर्षी किमान तापमान 08 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होणे शक्य असून त्या कालावधीत म्हणजेच 15 डिसेंबर ते 15 जानेवारी या काळात विशेष काळजी घेणे भाग पडेल. सध्या अरबी समुद्राचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान 29 अंश सेल्सिअस, बंगालचा उपसागर व हिंदी महासागराचे तापमान 29 अंश पृष्ठभागाचे तापमान 30 अंश सेल्सिअस राहण्यामुळे हवामान स्थिर राहील, तर प्रशांत महासागराचे पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान, पेरूजवळ 14 अंश व इक्वेडोरजवळ 21 अंश सेल्सिअस राहील. तसेच ला निनाचा प्रभाव सध्या नाही.